असे कुठे कायंय ?

ते खूप सुंदर कविता करतात,

मग आम्ही काही लिहूच नाही असे कुठे कायंय ?

त्यांच्या उपमा खूप सुरेख असतात,

मग आम्ही आमच्या शिरा ताणूच नयेत असे कुठे कायंय ?

ते अमुक अमुक वृत्तात लिहितात,

मग आमच्या मात्रा चुकूच नयेत असे कुठे कायंय ?

त्यांना तमुक तमुक छंदातील कविता उत्तम जमतात,

मग आम्ही छंद बाळगूच नये असे कुठे कायंय ?

त्यांच्या कविता लयीत असतात,

मग आमचा वेगळा ताल असूच नये असे कुठे कायंय ?

त्यांच्या कवितेला खूप वाचक असतात,

मग आम्ही शब्दांचे याचक असूच नये असे कुठे कायंय ?

त्यांच्या कवितेत भावना ओथंबून असतात,

मग आम्ही भावना मांडूच  नयेत असे कुठे कायंय ?

त्यांच्या कवितेला साहित्याची खूप मोठी परंपरा आहे,

मग आम्ही परंपरा मोडूच नये असे कुठे कायंय ?