पुस्तक वाचणाऱ्या पोरानं आईला विचारलं,”आई,धर्म म्हंजी काय गं?”
टोपल्यात उरलेली एकच भाकर चटणीसंगं खाणाऱ्या आईला नेमकं सांगता येईना.पोराला आईच्या अडाणीपणाचा राग आला.ते बोललं,”तुला तर कायच येत न्हाई.”
तेवढ्यात दारातून आवाज आला.”माई,धर्म करा.उपाशी हाय,खायला द्या.”
आईनं अर्धी भाकरी मोडून पोराला दारावरच्याला द्यायला दिली.स्वतःची अर्धी भूक तांब्याभर पाण्यानं विझवली.हात धुतला.पोराला सांगितलं,”पोरा,ह्याला धर्म म्हणत्यात.”
रंग,प्रार्थना,कपडे ह्यापेक्षा पोराला ह्यो धर्म सोपा वाटला.पोरगं गालात खुदकन हासलं.नागरिकशास्त्राचं पुस्तक काढून वाचत बसलं.
— परेश.