पाऊस,
आज पुन्हा आठवला.
अचानक,अनाहूत भरून आलेले मेघ.
भरारणारा वारा अन् सैरावरा पक्षी.
समोरून तू,
सरीतून मार्ग काढणारी,
भिरभिरलेली नजर, शोधणारी आसरा.
नजर फिरली, भिडली.
वीज चमकली.
तू,
थिजलेली, भिजलेली अन्,
नाती जराशी रुजलेली.
वाहत्या निर्झरासम,
खळाळलेलं नातं.
कुठलही नाव न् देता
पावसासारखंच बरसलेल.
साक्षीला पाऊसच.
कधी मंद,संततधार तर,
कधी मुसळधार!
पाऊस,
आज पुन्हा आठवला.
अचानक,अनाहूत भरून आलेले मेघ.
भरारणारा वारा अन् ढळलेला पदर.
एक धागा, व्यवहाराचा.
तेवढाच कोरडा राहिलेला.
पाऊस,
डोळ्यातला आणि सोबतीचाही एक झालेला.
पाऊस,
आज पुन्हा आठवला.
अचानक, अनाहूत भरून आलेले मन.
भरारणारे विचार अन् सैरावैरा आठवणी.
तुझ्या, माझ्या आणि………..पावसाच्याही !!!