धर्म


पुस्तक वाचणाऱ्या पोरानं आईला विचारलं,”आई,धर्म म्हंजी काय गं?”
टोपल्यात उरलेली एकच भाकर चटणीसंगं खाणाऱ्या आईला नेमकं सांगता येईना.पोराला आईच्या अडाणीपणाचा राग आला.ते बोललं,”तुला तर कायच येत न्हाई.”
तेवढ्यात दारातून आवाज आला.”माई,धर्म करा.उपाशी हाय,खायला द्या.”
आईनं अर्धी भाकरी मोडून पोराला दारावरच्याला द्यायला दिली.स्वतःची अर्धी भूक तांब्याभर पाण्यानं विझवली.हात धुतला.पोराला सांगितलं,”पोरा,ह्याला धर्म म्हणत्यात.”
रंग,प्रार्थना,कपडे ह्यापेक्षा पोराला ह्यो धर्म सोपा वाटला.पोरगं गालात खुदकन हासलं.नागरिकशास्त्राचं पुस्तक काढून वाचत बसलं.
— परेश.

बोले तैसा चाले

“मी जगाची पर्वा करत नाही.आपल्या मनात येईल त्याप्रमाणे वागतो.”
हे वाक्य बोलायला खूप सोपं पण वागायला खूपच अवघड आहे.

असे कुठे कायंय ?

ते खूप सुंदर कविता करतात,

मग आम्ही काही लिहूच नाही असे कुठे कायंय ?

त्यांच्या उपमा खूप सुरेख असतात,

मग आम्ही आमच्या शिरा ताणूच नयेत असे कुठे कायंय ?

ते अमुक अमुक वृत्तात लिहितात,

मग आमच्या मात्रा चुकूच नयेत असे कुठे कायंय ?

त्यांना तमुक तमुक छंदातील कविता उत्तम जमतात,

मग आम्ही छंद बाळगूच नये असे कुठे कायंय ?

त्यांच्या कविता लयीत असतात,

मग आमचा वेगळा ताल असूच नये असे कुठे कायंय ?

त्यांच्या कवितेला खूप वाचक असतात,

मग आम्ही शब्दांचे याचक असूच नये असे कुठे कायंय ?

त्यांच्या कवितेत भावना ओथंबून असतात,

मग आम्ही भावना मांडूच  नयेत असे कुठे कायंय ?

त्यांच्या कवितेला साहित्याची खूप मोठी परंपरा आहे,

मग आम्ही परंपरा मोडूच नये असे कुठे कायंय ?

इतिश्री आयुष्याची !

जीवनाच्या क्षणभंगुरतेविषयी विचार करता,

येतसे मनी फक्त चिंता,

कुठले आप्त, कोण स्वकीय,

केवळ काही  क्षणांचा गुंता !

life  प्रेमाने अधीर ते मन,

साता जन्माच्या आणा-भाका,

सरता वर्षे, भरता आयुष्य,

उरती फक्त नियतीच्या हाका !

मित्र परिवाराचा मोहक सहवास,

                                                                   निस्वार्थी मनाचे मानलेले ऋण,

                                                      सत्य अंती आयुष्याचे,

                                                         बाकी उरते केवळ शून्य !

सत्य असते म्हणे नेहमी नकारार्थी,

life1

तरी आयुष्य नसावे फक्त पोटार्थी,

अंताच्या प्रवासा जमलेली गर्दी माझ्या,

नसावी केवळ स्वमग्न-स्वार्थी !

………शोधतो आहे !!!

मी एकांतात स्वतःचे नाव शोधतो आहे,

सापडतो का मज मनाचा ठाव शोधतो आहे !!

असा मी, तसा मी,

कधी कुठे कसा मी

अंतरीचा भाव शोधतो आहे !!

कधी पडलो,सदैव लढलो,

हरलो वा जिंकलो

संघर्षाचा अविर्भाव शोधतो आहे !!

कुणी आपला,कुणी परका,

कुणाच्या चेहऱ्यावर आपलेपणाचा बुरखा

आपल्यात आपलेपणाचा स्वभाव शोधतो आहे !!

जुन्या जखमा बाळगताना उरात,

परकेच ठरताना आपल्याच घरात

माणसांच्या आपल्याच जखमांचे घाव सोसतो आहे !!

मी एकांतात स्वतःचे नाव शोधतो आहे,

सापडतो का मज मनाचा ठाव शोधतो आहे !!!!!

पाऊस-आठवणीतला,सोबतीतला.

पाऊस,

आज पुन्हा आठवला.

अचानक,अनाहूत भरून आलेले मेघ.

भरारणारा वारा अन् सैरावरा पक्षी.

समोरून तू,

सरीतून मार्ग काढणारी,

भिरभिरलेली नजर, शोधणारी आसरा.

नजर फिरली, भिडली.

वीज चमकली.

तू,

थिजलेली, भिजलेली अन्,

नाती जराशी रुजलेली.

वाहत्या निर्झरासम,

खळाळलेलं नातं.

कुठलही नाव न् देता

पावसासारखंच बरसलेल.

साक्षीला पाऊसच.

कधी मंद,संततधार तर,

कधी मुसळधार!

पाऊस,

आज पुन्हा आठवला.

अचानक,अनाहूत भरून आलेले मेघ.

भरारणारा वारा अन् ढळलेला पदर.

एक धागा, व्यवहाराचा.

तेवढाच कोरडा राहिलेला.

पाऊस,

डोळ्यातला आणि सोबतीचाही एक झालेला.

पाऊस,

आज पुन्हा आठवला.

अचानक, अनाहूत भरून आलेले मन.

भरारणारे  विचार अन् सैरावैरा आठवणी.

तुझ्या, माझ्या आणि………..पावसाच्याही !!!

कसा मी?कसा मी?

Imageसकाळी पेपर उघडल्याबरोबर भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचून डोक्यात तिडीक जाते.बलात्काराच्या,खुनाच्या बातम्या वाचून मन सुन्न होते.समजत नाही समाजाला काय झालय ते.वैताग येतो.समाजाला दोन-चार शिव्या देऊन उठतो.नेहमीच्या कामाला लागतो.जाताना No Entry मध्ये घुसतो.पोलीस म्हणतो,३५०/- ची पावती करा. Month End ला इतकी पावती? त्यापेक्षा मिटवून घ्या म्हणतो.५० रुपयांवर व्यवहार मिटवतो.व्यवहारी म्हणून स्वताची पाठ थोपटत पुढे जातो.

————————————–@@@@@@@@@@@@@——————————————————–                                                    नीती-मुल्यांवर,हरवत चाललेल्या संवादावर तोंडभरून बोलतो.नात्यातील दरी कशी वाढतेय हे कुठेतरी वाचलेल्या उदाहरणांवरून पटवून देतो. संध्याकाळी घरी आल्यावर आईने केलेली दिवसभराची चौकशी कटकट म्हणून उडवून लावत Internet वर संवाद साधतो.

———————————@@@@@@@@@@@@@@@——————————————————–                                                    Multiplex मध्ये मी नेहमी १५/-ची Coldrinks ची बाटली २०/-रुपयांना हौसेने विकत घेतो.१८०/- च्या तिकीटात मनसोक्त सिनेमा पाहतो.संध्याकाळी घरी परतताना भाजी घेऊन,शेतक-याशी हुज्जत घालून दोन-चार रुपये तरी हमखास वाचवतो.

——————————–@@@@@@@@@@@@@@@———————————————————                                                   सिनेमातला Family Drama,देशभक्ती बघून मन माझं उचंबळून येतं.तसा मी अतिशय भावनाप्रधान आहे म्हणा ना! या भावनातिरेकाने कधी कधी डोळ्यातून एखादा थेंबही काढतो.कौटुंबिक अडचणीमध्ये मी नेहमी व्यावहारिक चातुर्याने जबाबदारी टाकत अंग चोरतो.

——————————@@@@@@@@@@@@@@@———————————————————–                                                कधी कधी मी स्वताशीच विचार करतो.कसा मी?कसा मी? माझ्यातल्या खोटारडेपणाचा मलाच तिटकारा येतो, घृणा वाटते. माझ्या मनाचा हलवा कोपरा जागा होतो, स्वताचा राग येतो,ठरवतो. आता तरी खरं वागूया, बुरखा टाकून खरोखरचं जीवन जगूया. मनाशी ठरवतो. उठतो.मस्तपैकी कडक चहा घेतो आणि पुन्हा पुर्वीसारख व्यावहारिक आयुष्य जगायला सज्ज होतो.

टू सर,विथ लव्ह-एका अभिजात पुस्तकाचा परिचय.

                      मि.ब्रेथवेट,ग्रीन्सलेड सेकंडरी स्कूल मध्ये आलेला नवीन आणि तरुण शिक्षक. त्याला देण्यात आला शाळेतील सर्वात वरचा वर्ग, अतिशय निर्ढावलेला आणि उद्धट मुला-मुलींचा वर्ग. ज्या वर्गाला शिकवणे तर दूरच, त्यांना सांभाळणेही इतर शिक्षकांना अशक्यप्राय वाटायचे.अशा वर्गाला मि.ब्रेथवेट यांनी केवळ सांभाळलेच नाही तर त्यांना शिकवले देखील ! सरांनी मुलांशी झटापट केली,प्रसंगी कुस्तीसुद्धा खेळली.हळूहळू त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणला आणि एक दिवस स्वत:च त्या मुलांवर निरतिशय प्रेम करू लागले.

                       त्यांच्या वर्गातील गुंडगिरी करणारी, निर्ढावलेली मुले त्यांना ‘सर’ म्हणून आदराने हाक मारू लागली. त्या मुलांच्या गलीच्छ वस्तीतल्या पोरीना सन्मानानं ‘मिस’ म्हणायलाही सरांनीच शिकवलं.त्या मुलांना हात स्वच्छ धुवायला शिकवलं आणि त्याचबरोबर शेक्सपिअरसुद्धा वाचायला शिकवलं.

                       एका ध्येयाने प्रेरित झालेल्या शिक्षकाने रागाचं,द्वेषाचं,तिरस्काराचं रुपांतर प्रेमात केलं. पौगंडावस्थेतील बंडखोरीचं रुपांतर आत्मविश्वासात केलं.प्रत्येक शिक्षकाने व विद्यार्थ्यानेही वाचावे असे पुस्तक….!

पुस्तकाचा माझ्या शब्दातील परिचय ऐकण्यासाठी खाली दिलेल्या LINK वर क्लिक करा.

https://www.box.com/s/pvo1m8ybp24nhav9q8ic

शहाणपण !!!

“Two things are infinite: the universe and human stupidity; and I’m not sure about the universe.”
― Albert Einstein

“दोन गोष्टी अनंत आहेत;विश्व आणि माणसाचा मूर्खपणा;आणि यातील विश्वाविषयी मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही.”

-अल्बर्ट आईन्स्टाईन,

कधी कधी आम्ही खूप शहाण्यासारखे वागतो !!!

सर्वांसाठी लढलेल्या महापुरुषांची आम्ही वाटणी केलीय,

छत्रपती एकाचे,फुले दुस-याचे.

आंबेडकर अमक्याचे, तर बाजी तमक्याचे.

आम्ही फक्त आमच्या महापुरुषांना मानतो.

कारण, कधी कधी आम्ही खूप शहाण्यासारखे वागतो!!

आम्ही त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्याही साज-या करतो.

त्यांचे पराक्रम तर सर्वांनाच ठाऊक आहेत.

म्हणून आम्ही त्यांच्यापुढे हिंदी गाणी लाऊन नाचतो.

कारण. कधी कधी आम्ही खूप शहाण्यासारखे वागतो!!

हॉटेलात भरमसाठ बिल देऊन वर काही टीप देतो.

भाजीवाल्याशी काही रुपयांसाठी भांडतो.

आयुष्यात आम्ही काटकसरही महत्वाची मानतो.

कारण. कधी कधी आम्ही खूप शहाण्यासारखे वागतो!!

राजकारण्यांवर क्रियाशून्यतेवरून आम्ही सडकून टीका करतो.

मतदानादिवशी जोडून सुट्टी म्हणून आम्ही पिकनिकला जातो.

माझ्या एका मताने असा काय फरक पडतो?

कारण. कधी कधी आम्ही खूप शहाण्यासारखे वागतो!!

फेसबुकवर मिनिटांमिनिटाला अपडेट, chatting करतो.

घरच्यांसाठी मात्र कायम offline असतो.

संवाद वगैरे out of date गोष्टी कोण करत बसतो?

कारण. कधी कधी आम्ही खूप शहाण्यासारखे वागतो!!

आयुष्य संपन्न बनवण्यासाठी पैसा लागतो हे आम्ही जाणतो.

पैसा कमावण्यासाठी आम्ही धाव धाव धावतो.

जगण्यासाठी धावताना आम्ही जगायचंच विसरतो.

कारण.

कधी कधी आम्ही खूप शहाण्यासारखे वागतो!!

खरयं ना ???????